मुंबई दि.११ – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मुंबई हायकोर्टाने सीबीआयकडे हा तपास सोपवला होता.तर सीबीआयला मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यासंदर्भातही अधिकार दिले होते. सीबीआयने चौकशी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी उतरली असून अनिल देशमुखांविरोधात ईडीने ECIR दाखल केला आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा असल्यास ईडी तात्काळ याचा तपास करण्यासाठी पुढे येते आणि ECIR नोंदवत असते. ECIR म्हणजे तपास सुरू करण्यापूर्वी नोंदवलेलं पहिलं अधिकृत दस्तऐवज, जसे पोलीस एफआयआर नोंदवत असतात, तसं ईडी ECIR नोंदवत असते.
दरम्यान परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर चांदीवाल समितीला दिवाणी न्यायालय अधिकार बहाल करत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्याला 100 कोटी महिन्याचं टार्गेट देऊन वसुली करायला लावल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुख यांच्यावर असून आता या प्रकरणात ईडी आल्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.