केज दि.11 – रस्त्याने चालत असलेल्या दुचाकीस्वारास स्कुटी आडवी लावून तिघांनी मारहाण करीत नगदी ५ हजार ७०० रुपये आणि मोबाईल काढून घेत १२ हजार ७०० रुपयांचा ऐवज काढून घेतल्याची घटना केज – धारूर रस्त्यावरील कासारी पाटीच्या जवळ १० मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
धारूर तालुक्यातील चोरांबा येथील गौतम ज्ञानोबा भालेराव ( वय ४९ ) हे जीप चालक असून ते अंबाजोगाई येथील स्नेह नगरमध्ये वास्तव्यास आहेत. १० मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास केज – धारूर रस्त्याने येत असताना पाठीमागुन स्कुटीवर आलेल्या तिघांनी स्कुटी त्यांच्या गाडीला आडवी लावून भालेराव यांना थांबविले. त्यांनी तु आमच्या अंगावर का थुकलास असे म्हणुन चापटाबुक्क्याने मारहाण करून मुक्कामार दिला. त्यांच्या जवळील नगदी ५ हजार ७०० रुपये आणि ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा १२ हजार ७०० रूपायांचा ऐवज बळजबरीने काढून घेत तेथून पोबारा केला. त्यांनी लगेच धारूर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता सदर घटनास्थळ हे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गौतम भालेराव यांच्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.