बीड दि.१२ – बारामती तालुक्यातील मुढाळे गावातील राहणाऱ्या 76 वर्षांच्या आजीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यानं आजीला घरातचं विलगीकरणात ठेवून उपचार केले जात होते. वय जास्त असल्यानं दोन आठवड्यानंतर देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. घरातील सर्वजण कोरोना नियमांचे पालन करून आजीची काळजी घेत होते. आजीची प्रकृती पाहून तिला रूग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रकृती आणखी बिघडत चालल्यानं आजीला शहराच्या ठिकाणी म्हणजेच बारामतीला नेण्याचा निर्णय झाला. आजीला घेऊन जात असताना तिच्या हालचाली बंद झाल्या. बराच वेळ प्रयत्न करूनही आजीच्या हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे आजी गेल्याचं कुटूंबीयांना वाटलं. त्यामुळे अर्ध्या रस्त्यातूनच गाडी माघारी फिरवण्यात आली.
दरम्यान आजी गेल्याचं कळताच घरच्यांनी हंबरडा फोडला. नातेवाईकांना फोन करून बोलवण्यात आलं. आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पण काही वेळातच आजीने डोळे उघडले. त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. आजी जिवंत असल्याचं सर्वांना कळताच सर्वत्र एकच हशा पिकला. त्यानंतर आजी जिवंत असल्याचं नातेवाईकांना सांगण्यात आलं.