केज दि.१२ — घराकडे निघालेल्या ३५ वर्षीय महिलेस घराकडे सोडतो असे सांगून दुचाकीवर बसवून नेत विनयभंग करीत काठीने मारहाण केल्याची घटना युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित ३५ वर्षीय विवाहित महिला ही पोट दुखत असल्याने ७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता मेडिकलहुन गोळ्या घेण्यासाठी गावाकडून रिक्षाने बनसारोळा येथे आली होती. गोळ्या घेतल्यानंतर परत घराकडे चालत निघाली होती. याचवेळी आरोपी बंडू इब्राहिम पठाण ( रा. बनसारोळा ) हा पाठीमागून आला. तुम्हाला घरी सोडतो अशी गप मारून त्याने पीडित महिलेला दुचाकीवर बसविले. दुचाकी घराकडे न नेता बोरीसावरगाव येथील तळ्याकडे घेऊन गेला. इकडे कुठे आणले अशी विचारणा करीत महिला गाडीवरून उतरली. बंडू पठाण याने पीडित महिलेच्या हाताला आणि साडीला ओढत विनयभंग केला. पीडित महिला घाबरून पळू लागली असता बंडू याने पीडित महिलेच्या हातावर काठीने मारले. त्यामुळे पीडित महिला चक्कर येऊन खाली पडलेली पाहून आरोपी बंडू पठाण तेथून पळून गेला. ११ मे रोजी दिलेल्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बंडू पठाण याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात ॲट्रॉसिटी व विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत व जमादार संजय राठोड हे पुढील तपास करत आहेत.
विवाहितेची आत्महत्या, नवऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
केज दि.१२ – येथे हॉटेल सुरू करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून छळ होत असल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या नवऱ्यासह सासरच्या पाच जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज येथे दि. ११ मे रोजी रात्री १०:०० वा. च्या दरम्यान केज येथिल २२ वर्षीय विवाहिता राहत शहाबन कुरेशी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विवाहितेचे वडील मंजूर युनूस कुरेशी रा. मोहोळ जि. सोलापूर यांनी केज पोलीस स्टेशनला त्यांची मुलगी मयत राहत शहाबन कुरेशी हिला तिचा नवरा, सासरा, दिर, जाऊ व नणंद यांनी संगनमत करून मारहाण करून वारंवार शारीक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तक्रार दिली. त्या नुसार मयत विवाहितेचा नवरा शहाबाज कदिरमियाँ कुरेशी, सासरा कदिरमियाँ कुरेशी, दिर आयफान कदिर मियाँ कुरेशी, जाऊ हिना आयफान कुरेशी व नणंद रिजवान मुजिब कुरेशी यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.