Site icon सक्रिय न्यूज

आजही महाराष्ट्रात अश्या घटना घडतात…….!

आजही महाराष्ट्रात अश्या घटना घडतात…….!

बीड दि.१४ – अनेक कायदे केले तरी जात पंचायतीने दिलेल्या विकृत शिक्षांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 9 एप्रिल 2021 रोजी जातपंचायतीमध्ये थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याचा आरोप एका पीडितेने केला आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केल्याच्या कारणावरुन जातपंचायतीने संबंधित महिलेला ही शिक्षा दिली. ही शिक्षा दिल्याप्रकरणी दहा पंचांवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरण तपासासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिसांकडे वर्ग केलं आहे. जात पंचायतीमधील एकनाथ शिंदे, प्रेमनाथ शिंदे, गणेश बाबर, शिवनाथ शिंदे, किसन सावंत, दिनेश चव्हाण, काशिनाथ बाबर, कैलास शिंदे, कैलास सावंत, संतोष शेगर या दहा पंचांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर याच्याशी 2011 साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने 2015 मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. पीडित महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटित व्यक्तीशी पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाह जात पंचायतीने अमान्य केला आणि पंचांनी तिला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

दरम्यान, या प्रकरणी आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी विनंती केली आहे.

शेअर करा
Exit mobile version