पुणे दि.१४ – कोरोनाचा विळखा राज्यातच नव्हे तर देशभर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अनेकांनी आता पुढे येत आपापल्या परीने मदत करायला सुरूवात केली आहे. कोरोनाची भीषण परिस्थिती पाहून अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. अशात पुण्यातील भाजी विकणाऱ्या आजीनं समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीनं एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली आहे. मालन वणवे असं या आजीचं नाव आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यावसाय करतात. मालन वणवे या आजी स्वतः आजारी पेशंट आहेत.
विशेष म्हणजे आपल्या नातवांच्या शिक्षणासाठी बॅंकेत 25 हजारांच्या दोन ठेवी ठेवल्या होत्या. कोरोना रुग्णांची अवस्था पाहाता त्यांनी या दोन्ही ठेवी मुदतीपूर्वी मोडीत काढल्या आहेत. तसेच आपल्या कुटुंबीयांकडून काही पैसे घेत, एकूण 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली आहे.
दरम्यान, घरात ठेवलेला पैसा काय कामाचा, जर हाच पैसा एखाद्या गरजूसाठी उपयोगात येणार असेल, तरच या पैशाच खरं मुल्य आहे, असं मालन वणवे यांनी म्हटलं आहे.