केज दि.१४ – पैसे का देत नाहीस असे म्हणत एका हॉटेल चालकास कारमध्ये बसवून शेतात नेऊन काठीने व लोखंडी रॉडने डोक्यात व अंगावर मारहाण करीत डोंगरावरून ढकलून दिल्याची घटना धारूर तालुक्यातील भायजळी येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील मंगळवार पेठेतील टेल्लर गल्लीत वास्तव्यास असलेले बालाजी कल्याण सुरवसे ( वय ३० ) हे मिस्त्री काम आणि चहाचे हॉटेल चालवितात. ते २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता शहरातील मोंढ्यात असताना आरोपी उज्वल उर्फ दादा मुंडे ( रा. भायजळी ता. धारूर ) याने गैरकायद्याची मंडळी जमवून पैसे का देत नाहीस असे म्हणत बालाजी सुरवसे यांना कारमध्ये ( एम. एच. ४४ जी ९५२ ) बसवून भायजळी येथील त्याच्या शेतात नेले. उज्वल मुंडे याने काठीने व लोखंडी रॉडने बालाजी यांच्या डोक्यात, तोंडावर, हातापायावर, पोटावर बेदम मारहाण केली. पुन्हा मित्रांना बोलावून घेऊन काठीने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देऊन डोंगरावरून ढकलून दिले. रुग्णालयातून उपचार घेऊन आल्यानंतर १३ मे रोजी बालाजी सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उज्वल मुंडे याच्यासह इतर अनोळखी आठ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक आशा चौरे या पुढील तपास करत आहेत.
केज बीड रोडवरील सावंतवाडी फाट्याजवळ आरोग्य कर्मचाऱ्याला लुटले, दागिन्यासह ९३ हजाराचा ऐवज लंपास…..!
केज दि.14 – नाशिकहुन लातूरकडे निघालेल्या आरोग्य कर्मचाऱ्याची कार अडवून चोरट्यांनी लोखंडी गजाचा आणि काठीचा धाक दाखवून नगदी २१ हजार रुपये, दागिने असा ९३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी ( ता. केज ) फाट्याच्या जवळ घडली. याप्रकरणी अनोळखी चार चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील सलगरा बु. येथील प्रदीप अशोक कांबळे ( वय ३६ ) हे नाशिक आरोग्य विभागात नोकरीस आहेत. ते त्यांचे कुटुंब घेऊन स्वीफ्ट कारने ( एम. एच. ०२ ईएच १०६८ ) नाशिकहुन लातूरकडे निघाले होते. १४ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची कार केज – मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी ( ता. केज ) फाट्याच्या जवळ आली असता चार चोरटे अचानक कारसमोर आल्याने त्यांनी ब्रेक दाबले. चोरट्यांनी कारची चावी काढून घेत लोखंडी गजाचा व काठीचा धाक दाखवून त्यांच्याकडील २१ हजार रुपयांची रोकड, सोन्या – चांदीचे दागिने असा ९३ हजार ४०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. प्रदीप कांबळे यांच्या फिर्यादीवरून चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत.