केज दि.27 – तालुक्यातील आडस येथील भोंदूबाबा वैजनाथ बळीराम म्हेत्रे हा गेली 20 वर्षांपासून आडस, केज, धारूर व परिसरातील सामान्य, गरीब व भोळ्याभाबड्या लोकांना गुप्तधन काढून देतो, करणी, भानामती व भूत बाधेपासून मुक्ती देतो असे सांगून लाखो रुपये उकळत असून जनसामान्यांचे आर्थिक , मानसिक व लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारी असून किल्ले धारूर पोलीस स्टेशन ने त्याला तात्काळ अटक करून कारवाई करून गरीब व सामान्य लोकांचे शोषण तात्काळ थांबवावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बीड जिल्हा कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केले आहे.
तालुक्यातील आडस येथे वैजनाथ बळीराम म्हेत्रे (महाराज) नावाचा भोंदू व्यक्ती लोकांना आपल्याकडे रिद्धीसिद्धी प्राप्त असल्याचे सांगून फसवेगिरी करतो. या माध्यमातून खूप पैसे कमावले असून त्याच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे. आता तो आपल्या आर्थिक ताकदीचा वापर गुन्हेगारी साठी करून दहशत निर्माण करतो.त्यामुळे गेली कित्येक वर्षे कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र या भोंदू च्या विरोधात आडस येथीलच एका महिलेने या बाबाने गुप्तधन व इतर समस्यांचे निवारण करण्यासाठी जवळपास सहा लाख रुपये उकळळ्याची तक्रार केली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्ण ताकदीने तक्रारदार महिलेच्या पाठीशी उभी राहणार असून त्या भोंदूला अटक करून त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणीही बीड जिल्हा अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान पुढील दोन दिवसात वरील व्यक्तीला अटक न झाल्यास शुक्रवार दि. 21 मे 2021 पासून साथ रोग कायद्याचे संपूर्ण पालन करून दोन प्रतिनिधी किल्ले धारूर पोलीस स्टेशन समोर दररोज सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीने सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.