केज दि.17 – तालुक्यातील कुंबेफळ भागातील कोरोणा रुग्णांना आपल्या भागातच उपचार मिळावेत यासाठी कुंबेफळ येथे कोविड सेंटर उभा करण्यात यावे अशी स्थानिकांची इच्छा होती. त्यानुसार जि. प.सदस्य डॉ. योगिनी थोरात यांनी पर्यायाची चाचपणी चालू केली होती. अशातच केज येथील नवचेतना सर्वांगिण विकास केंद्र, केज च्या संचालिका मनीषा घुले या आपल्या मदतीला धावून आल्याने कुंबेफळ येथे जिल्हा आरोग्य विभाग, नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय कुंबेफळ आणि डॉ. योगिनी थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने आता लवकरच 40 बेड चे कोविड केअर सेंटर कार्यान्वित होणार आहे.
डॉ. योगिनी थोरात यांच्या कुंबेफळ येथील दवाखान्या समोरील जागेमध्ये या कोविड केअर सेंटर ची उभारणी सुरू असून याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी स्वतः पाहणी केली असून येत्या 4-5 दिवसांत हे कोविड केअर कार्यान्वित होणार असून याचा कुंबेफळ व परिसरातील कोरोना रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
कोविड केअर सेंटर ला लागणारे कॉट, बेडशीट, पेशंट साठी चहा नाष्टा व जेवण इत्यादी सेवा नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, केज च्या वतीने पुरवणार आहेत.तर यासाठी लागणारे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व लाईट ची सुविधा कुंबेफळ ग्रामपंचायतच्या वतीने पुरविल्या जाणार असून याची जबाबदारी सरपंच किशोर थोरात व ग्रामसेवक श्रीमती शेख यांनी घेतली आहे. तसेच या कोविड सेंटर मधील ऍडमिट कोरोना पेशंट वर जिल्हा आरोग्य विभाग च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार आणि केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व युसुवडगाव येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम आणि डॉ. योगिनी थोरात या मोफत उपचार करणार आहेत. सदरील ठिकाणी लक्षणे विरहीत आणि सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवर उपचार होणार असल्याने परिसरातील रुग्णांना याचा मोठा आधार मिळणार आहे.
दरम्यान हे कोविड केअर सेंटर सार्वजनिक असल्याने गावातील प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देऊन ही कोरोनामुक्तीची चळवळ यशस्वी करावी असे आवाहन डॉ. योगिनी थोरात यांनी केले आहे.