अंबाजोगाई दि. १८ ( पांडुरंग केंद्रे) कोरोना महामारीच्या भीतीने सर्वजन पछाडलेले आहेत. या भीतीच्या आडुन खाजगी तपासणी लॅब चालकांनी दलालांच्या माध्यमातून गोरगरीब कोरोना रुग्णांची दिशाभूल करत अक्षरश: लुट सुरू केल्याचा लोखंडी सावरगावच्या कोवीड रुग्णालयातील प्रकार जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे यांनी उघडकीस आणला आहे. या रॅकेटमध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी आढळून आल्यानंतर अधिक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी त्यास निलंबित केले आहे. तर एका खाजगी लॅबच्या विरोधात पोलीसात तक्रार दिली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील एक कुटुंब कोरोना बांधित असल्यानेे त्यांच्यावर
लोखंडी च्या कोवीड रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी तिथे नंदकिशोर पांचाळ कंत्राटी कर्मचारी यानेे रुग्णांना तपासणी अत्यावश्यक असुन त्यासाठी दोन व्यक्तीसाठी साडेसहा हजार रुपये लागतील असे सांगितले. अधिच कोरोनामुळे घाबरलेल्या रुग्णाने तयारी दर्शविल्यानंतर नंदकिशोर पांचाळने खाजगी लॅबच्या माणसाला बोलावून घेत रक्त तपासणीसाठी दिले. याबाबत माहिती मिळाल्या नंतर बर्दापुर जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे यांनी लॅब चालकास चांगलेच फैलावर घेतले आणि रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांना कळवले.
या प्रकरणी अधिक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी सखोल चौकशी केली असता रुग्णालयातील नंदकिशोर पांचाळ हा कंत्राटी कर्मचारी या रॅकेटमध्ये सामील असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यास तत्काळ निलंबित केले. तर सोमवारी दि. १७ रोजी अंबाजोगाई येथील प्रवीण लॅबचा अभिजित सुधाकर सोळंके हा व्यक्ती रुग्णालयात रक्ताचे नमुने घेताना आढळून आला त्यामुळे डॉ. चव्हाण यांनी सदरील लॅब आणि व्यक्तीच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान इतर काही सेंटरमधून याच प्रकारचे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. खेड्यापाड्यातील गोरगरीब रुग्णांच्या अज्ञानांचा गैरफायदा घेत त्यांना लुबाडणारे खाजगी लॅब चालकाचे रॅकेट सर्व कोवीड सेंटरमध्ये सक्रिय आहे. ज्या रुग्णांना कोणत्या वार्डमध्ये जायचे ? कोणाला भेटायचे ? हे माहीत नाही असे भोळेबाबडे रुग्ण हेरले जातात, दिशाभुल केली जाते आणि भिती घालून दलाल त्यांना अव्वाच्या सव्वा दराने चाचण्या करण्यास भाग पाडतात. या रॅकेटचे दलाल शोधून सुत्रधारांना उघडे करुन सर्व सामान्यांची लुट थांबवावी असे जि. प. सदस्य अविनाश मोरे यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयातील कोरोना टेस्ट, सिरम फॅरॅटिन, एलडीएच, इंटरल्युकिन डायमर या चाचण्या विनामूल्य उपलब्ध आहेत. आम्ही कोणत्याही खाजगी लॅबकडे देत नाहीत जर दिशाभुल करुन खाजगी लॅबकडे पाठवत असेल तर त्वरित रुग्णालयात प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन अधिक्षक, वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र लोखंडी सावरगाव यांनी केले आहे.