केज तालुक्यातील ‘या’ गावच्या ग्रामस्थांनी केला मदतीचा हात पुढे…….!
केज दि.१८ – कोरोनाच्या हाहाकारात समाजाची सर्व घडी विस्कटून गेली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढू लागल्याने खाजगी कोविड सेन्टरला मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर तालुक्यातील केवड गावच्या ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे करत शिरूर घाट येथील लताई कोविड केअर सेंटर तसेच कळसंबर येथील वृद्धाश्रमाला मदत केली आहे.
अनेकांच्या कुटुंबात कोरोनाने शिरकाव केल्याने कित्येक कुटूंब उध्वस्त झाली आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने सरकारी कोविड केअर सेंटर तुडुंब भरल्याने खाजगी कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. मात्र तिथेही रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने दोन वेळचे जेवण आणि नाष्ठा यासाठी केंद्र चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. आणि याच गोष्टीचा विचार करून तालुक्यातील केवड येथील कांही ग्रामस्थांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी मदतिसाठी पुढे येत जमेल तसे योगदान देऊन ज्वारी, गव्हू, तांदूळ, किराणा आणि भाजीपाला एकत्र केला. आणि ते सर्व जमलेले साहित्य मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस आणि कल्याण केदार यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या लताई कोविड केअर सेंटर व कलसंबर येथील वृद्धाश्रमाला सुपूर्द केले.
दरम्यान ग्रामीण भागातील केवड सारख्या छोटयाशा गावातून अश्या प्रकारची मदत केली गेल्याने इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून इतर घटकांनीही मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.