केज दि.19 – केज मुलीस चांगले सांभाळा असे जावयाला समजावून सांगण्यास आलेल्या सासू चा भर दिवसा खून करून पसार झालेल्या जावयास तब्बल २३ दिवसांनी १८ मे रोजी केज पोलिसांनी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवाडगाव येथील शेतात सकाळी झोपेत असताना बेड्या ठोकल्या आहेत.
मुलीस चांगले सांभाळा असे जावयास समजावून सांगण्यास अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे व त्यांचा चुलत पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे साळेगाव येथे आले असता यांच्यावर जावई अमोल वैजिनाथ इंगळे व त्याचा पुतण्या बंटी उर्फ प्रशांत बबन इंगळे या दोघांनी दि. २५ एप्रिल, रविवार दुपारी धारदार कोयत्याने हल्ला केला होता. यात सासू लोचना माणिक धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हा गंभीर जखमी झाला होता. सासूचा खून केल्या नंतर जावई अमोल इंगळे व त्याचा पुतण्या बंटी उर्फ प्रशांत इंगळे हे दोघेहि अंकुश धायगुडे यांची होंडा शाईन मोटार सायकल घेऊन गांजी रस्त्याने पसार झाले होते. या प्रकरणी केज पोलिसात अंकुश धायगुडे याच्या फिर्यादी वरून अमोल इंगळे व बंटी उर्फ प्रशांत इंगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच बंटी उर्फ प्रशांत इंगळे यास तात्काळ ताब्यात घेतले होते. मात्र मुख्य आरोपी अमोल इंगळे हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे पोलिसांचे दोन पथके तैनात करण्यात आली होती.
आरोपी हा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवाडगाव येथे शेतात असल्याची गुप्त माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी मंगळवार दि. १८ मे रोजी पहाटे सापळा लावून सकाळी ७ वा. च्या दरम्यान आरोपी झोपेत असतानाच त्यास बेड्या ठोकल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, मतीन इनामदार, मंगेश भोले, अमोल गायकवाड, तपास शाखेचे दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, बाळासाहेब थोरात यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेण्यासाठी परिश्रम घेतले.
दरम्यान अमोल इंगळे याने सासू लोचना धायगुडे यांचा खून करून रक्ताने माखलेल्या कपड्यासह चुलत मेव्हण्याच्या दुचाकीवरून गांजी मार्गे सोनीजवळा गाठले. मात्र सोनीजवळ्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून जात असताना दुचाकी मधील पेट्रोल संपल्याने त्याने शेतात दुचाकी लावून तो फरार झाला होता आणि तेंव्हापासून पोलिसाना गुंगारा देत होता. मात्र त्यास तब्बल २३ दिवसांनी केज पोलिसांनी बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पट्टीवडगाव येथील शेतात बेड्या ठोकल्या आहेत.