बीड दि.19 – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने १९ मे रोजी केज तालुक्यातील धनेगाव येथे गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली असता त्या ठिकाणाहून १ लाख ३८ हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आलेली आहे.
सध्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून सर्व दारू दुकाने बंद आहेत. अशावेळी मद्याची अवैधरित्या विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहे. १९ मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने युसुफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत धनेगाव ता. केज येथे एका निनावी पत्र्याच्या शेड मधून दारुचा साठा जप्त केला. आरोपी इसम नामे बालाजी विट्ठलराव कोथमिरे, वय ३२ वर्षे, रा. कळंब, तालुका कळंब, जि. उस्मानाबाद याने लॉक डाऊन कालावधीत देशी विदेशी मद्याचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्य निर्मिती मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या १८० मिलीचे १६ बॉक्स व देशी दारू टॅंगो पंच या ब्रॅंडच्या 90 मिली क्षमतेचे ३ बॉक्स, देशी दारू राजा संत्रा 180 मिली क्षमतेचे ४ बॉक्स असा दारुचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईत जप्त केलेल्या दारू ची किंमत रुपये एक लाख ३८ हजार इतकी आहे. तसेच आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त औरंगाबाद प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक श्री कडवे, दुय्यम निरीक्षक श्री घोरपडे, जवान नितीन मोरे व सादेक अहमद व जवान-नि-वाहन चालक जारवाल यांनी केली.
दरम्यान लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पथके नेमण्यात आली असून अवैध व बनावट दारू, हातभट्टीची दारू व परराज्यातील दारू विरोधात सातत्याने मोहीमा राबविण्यात येत असून यापुढेही अशा कारवाया सुरू राहील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे.