अंबाजोगाई दि. १९ ( पांडुरंग केंद्रे) अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी येथील २४ वर्षीय तरुण आणि १८वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दि १९ दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनिता शेषराव राठोड वय १८ आणि प्रविण सुधाकर काचगुंडे वय २४ दोघेही रा राजेवाडी ता. अंबाजोगाई अशी त्या दोघांची नावे आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता आणि प्रविण दोघेही बुधवारी पहाटे तीन वाजच्या सुमारास आपापल्या घरातुन बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी सकाळी ११ वाजेच्या आसपास राजेवाडी शिवारातील गायरानाच्या उतारावरील लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला एकाच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ४ च्या सुमारास काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांना माहिती दिली.
दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत उपनिरीक्षक जी केंद्रे बीट अमलदार गुट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वराती रुग्णालयात पाठविण्यात आले असून प्रेम प्रकरणाला होत असलेल्या विरोधामुळे या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली अशी चर्चा आहे.