मुंबई दि.20 – कोरोनामुळे आरोग्य सुविधांवर मोठा ताण आलेला दिसत आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर सारख्या आरोग्य सुविधा जरी आपण उपलब्ध करू शकलो तरी अतिरिक्त डाॅक्टर्स आणि परिचारिका कुठून आणणार, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर आता आरोग्य क्षेत्रातील हा प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.
राज्यात मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक 20 हजार युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग व डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. साथीच्या रोगांशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं, यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, आवश्यक वैद्यकीय सुविधांची ने-आण करण्यासाठी प्रशिक्षणामध्ये वाहनचालक तसेच ऍम्ब्युलनस वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश असेल. राज्यातील 1 लाख कारागिर, कामगार आदी घटकांना प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना त्यांच्या कौशल्याबाबत प्रमाणीत केले जाणार असल्याचं, नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.