नांदेड दि.20 – नांदेडमधील रूग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नांदेड शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये बिल वाढवण्यासाठी कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर उपचार सुरु ठेवल्याचा प्रकार घडला आहे. रुग्णाचा मृत्यू होऊन 3 दिवस ऊलटले तरी उपचार सुरु असल्याचं सांगून पैसे उकळल्याच्या आरोपावरून नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटल विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकलेश पवार यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते महिन्याभरापासून नांदेड येथील कोरोना रुग्णालयात उपचार घेत होते. पण अंकलेश पवार यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. रेमडेसिवीरची गरज असतानाही त्यांना ते इंजेक्शन दिलं गेलं नाही, तसेच इतर योग्य उपचारही करण्यात आले नाहीत. त्याऐवजी डॉक्टरांकडून अव्वाच्यासव्वा बिल आकारलं जात होतं. नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल करताना 50 हजार रूपये भरले होते. 21 एप्रिल रोजी रुग्णाच्या पत्नीकडून रुग्णालयाने आणखी फीची मागणी केली. तेव्हा रुग्णाची पत्नी शुभांगी यांनी 2 दिवसांचा वेळ मागितला. 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शुभांगी पवार यांनी 50 हजार रुपये ऑनलाईन आणि 40 हजार रुपये रोख भरले. त्यांनतर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं.
दरम्यान मयताची पत्नी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले आहेत.