बीड दि. 21 – मागच्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या रुढी परंपरांना फाटा देत आपल्या जन्मदात्या आईच्या प्रेताला लेकींनी खांदा देत अंत्यविधी पार पाडला. एवढंच नाही तर, मुखाग्नीही मुलीनेचं दिला आहे. कोरोनाचे नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी पार पडला आहे.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासारजवळील जांब येथील रहिवासी असणाऱ्या लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे यांचं काल पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. अशात लक्ष्मीबाई यांना एकूण सहा मुली आहेत. घरात कोणीही मुलगा नसल्यानं त्यांच्या प्रेताला खांदा कोण देणार? मुखाग्नी कोण देणार? अशी चर्चा नातेवाईकांत सुरू झाली होती. यावेळी लक्ष्मीबाई यांची सर्वात लहान मुलगी समोर आली आणि मी मुखाग्नी देते असं सांगितलं. तर अन्य 4 मुलींनी आईच्या प्रेताला खांदा देण्याचं ठरवलं. तर अन्य एका मुलीनं अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडली.
दरम्यान मृत लक्ष्मीबाई यांना सुनिता केदार, विमलबाई केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या 4 मुलींनी खांदा दिला. तर कचराबाई खंडागळे या मुलीनं अंत्यसंस्काराची सर्व तयारी केली. तर अंत्ययात्रेत पाणी, ताट घेऊन स्मशानभूमीकडे घेऊन जाण्याच काम सर्वात लहान मुलगी शंकुतला सुतार यांनी पार पाडली. गावातील स्माशानभूमीत नातेवाईकांच्या उपस्थितीत लक्ष्मीबाई यांच्या प्रेताला अग्नी दिला गेला. या संवेदनशील अंत्यसंस्कारानं गावातील लोकांना गहिवरून आले होते.