मुंबई दि.२२ – राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आज १५ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते. अडीच तास बैठक झाली असून या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘१५ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांना बारकाईने सर्वेक्षण करण्यास सूचना दिली आहे. तसेच जे बाधित असतील, ज्यांना लक्षणे असतील त्यांना होमक्वारंटाईन न करता विलगीकरण करा. कारण आम्ही होमक्वारंटाईनबाबत समाधानी नाही आहोत.’
बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘१५ जिल्ह्यात लॉकडाऊन, कडक निर्बंध असूनही रुग्णसंख्येचा आकडा कमी होत नाही आहे. विशेषतः एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जो कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्ह आकडा आला होता त्यापेक्षा जास्त आजही या आठवड्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी १५ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. कडक निर्बंध असून रुग्णसंख्येत वाढ का होत आहे? त्याची कारणे तपासा. त्याच्याप्रमाणे दुरुस्ती झाली पाहिजे. त्यादृष्टीने त्यांना सूचना द्याव्यात आणि मार्गदर्शन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांन दिल्या होत्या. यापद्धतीने आज आम्ही बैठक घेतली. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते. तसेच तेथील जिल्ह्यातील महासंचालक आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. १५ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि प्रमुखांशी सविस्तरपणे अडीच तास चर्चा केली.’ या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढण्यामागेच्या कारणाचे स्वरुप प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे आहे. परंतु त्याप्रमाणे आम्ही सूचना दिलेल्या आहेत. बारकाईने सर्वेक्षण करा. जे बाधित असतील, ज्यांना लक्षणे असतील त्याचे विलगीकरण करा. होम क्वारंटाईन करण्यात अर्थ नाही. आम्ही या मताचे आहोत. ज्यांची व्यवस्था चांगली आहे, त्यांचे समजू शकतो. परंतु ज्यांच्याकडे व्यवस्था चांगली नाही आहे, अशा व्यक्तींना घरात क्वारंटाईन केल्याने, तो संपूर्ण घराला बाधित करतो आणि बाहेर पडून बाहेरच्या लोकांना देखील बाधित करत असतो. म्हणून कोणत्याही परिस्थिती होम क्वारंटाईन अजिबात करू नये. त्यामुळे आता त्यांच्यासाठी विलगीकरणाची व्यवस्था करावी. तिथेच प्राथमिक उपचार केले तर त्याला पुढे रुग्णालयात जाण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’ असे थोरात यांनी सांगितले.
थोरात पुढे म्हणाले की, ‘कोरोना चाचणीचे प्रमाण वाढण्याची सूचना दिली आहे. चाचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पॉझिटिव्हचा आकडा वाढू शकतो. परंतु त्याची काळजी करण्याचे कारण नाही. पॉझिटिव्ह आकडा वाढला तरी रुग्णावर उपचार लवकर केले तर तो लवकर बरा होऊन घरी जातो आणि त्याचा परिणाम ऑक्सिजन, रेमडेसिवीर इथंपर्यंत जात नाही. तसेच मृत्यूचे प्रमाण कमी होते. त्यानुसार आम्ही सगळ्यांना सूचना दिल्या आहेत.’
दरम्यान बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर,अकोला, सातारा, वाशिम,बीड,गडचिरोली,अहमदनगर, उस्मानाबाद या पंधरा जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने होम कॉरंटाईन व निर्बंध घातले असून संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.