Site icon सक्रिय न्यूज

येत्या शैक्षणिक वर्षात सर्वच वर्गांसाठी दूरदर्शन ठरणार प्रभावी माध्यम……! 

येत्या शैक्षणिक वर्षात सर्वच वर्गांसाठी दूरदर्शन ठरणार प्रभावी माध्यम……! 

मुंबई दि.२४ – येत्या शैक्षणिक वर्षांत ऑनलाइन वर्गाना कंटाळलेल्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची नव्या शैक्षणिक वर्षांतही लवकर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नव्या शैक्षणिक वर्षांत शाळांचे परिसर विद्यार्थ्यांच्या उत्साहाला पारखे ठरण्याची शक्यता आहे.यंदा १५ जूनपासून सुरू होणारे नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन वर्गातच सुरू होणार असल्याचे दिसत आहे. त्यासाठी दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण, उजळणी वर्ग, स्वाध्याय पुस्तिका असे पर्याय शिक्षण विभाग उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे.

शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणेच यंदा १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही करोना परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. मुंबई, पुणे भागांतील रुग्णसंख्या स्थिर असली तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइनच होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागानेही तयारी सुरू केली आहे.

सध्या विद्यार्थी शिकत असलेल्या इयत्तेतील नेमक्या किती बाबी विद्यार्थ्यांना कळल्या आहेत, याबाबत ठोस अंदाज शिक्षकांनाही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बसवल्यानंतर त्यांना आधीच्या वर्गातील नेमके किती आकलन झाले आहे, कौशल्ये विकसित झाली आहेत का, याचा अंदाज घेऊन उजळणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यास साहित्यही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विकसित करत आहे. त्याचप्रमाणे स्वाध्याय पुस्तिकांचाही पर्याय आहे, अशी माहिती परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

दरम्यान गेल्या वर्षी केंद्राच्या ‘दीक्षा’ या उपयोजनाच्या आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयोग शिक्षण विभागाने केले होते. ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ या उपक्रमाद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर स्वाध्याय पाठवण्यात येत होते. त्यानंतर विविध सर्वेक्षणांमधून दूरदर्शन उपलब्ध असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यंदा सर्वच इयत्तांसाठी दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी दूरदर्शनकडे प्रस्तावही पाठवला आहे.

शेअर करा
Exit mobile version