अंबाजोगाई दि.27 – लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमधील एका नर्सला सोबत काम करणाऱ्या ब्रदरने दीड महिन्यापासून सतत पाठलाग करून त्रास दिला. त्यानंतर मंगळवारी (२५ मे) रात्री घरात घुसून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून त्या ब्रदरवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पिडीत नर्स सध्या लोखंडीच्या रुग्णालयात कर्तव्य बजावत आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील दिड महिन्यापासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री अपरात्री कोणीतरी दरवाजा ठोठावून जात असे. त्यांनी पाळत ठेवली असता त्यांच्यासोबत ब्रदर म्हणून काम करणारा अर्जुन अनंत फड (रा. दौंडवाडी, ता. परळी) हा दरवाजा ठोठावताना दिसून आला. दुसऱ्या दिवशी पिडीतेने अर्जुनला जाब विचारला असता तो तुमच्यासोबत लग्न करायचे म्हणू लागला. पिडीतेने त्यास विवाहित असल्याचे सांगून यानंतर त्रास न देण्यासाठी बजावले. परंतु, अर्जुनने त्यांचा सतत पाठलाग सुरु केला आणि काहीतरी कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करून त्रास देऊ लागला. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता पीडिता ड्युटीवरून घरी परतली असता अर्जुनने घरात घुसून तिचा विनयभंग केला. यावेळी पिडीतेने आरडाओरडा करण्याची धमकी दिल्याने अर्जुन तिला जीवे मारण्याची धमकी देत निघून गेला.
याप्रकरणी पिडीतेच्या आरोपावरून अर्जुन फड याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय मोनाली पवार या करत आहेत. दरम्यान, गुन्हा आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.