केज दि.२८ – एका २५ वर्षीय विवाहितेचा तिच्या घरात विनयभंग केला. तर आरोपीच्या वडिलाने पीडितेस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी दोघा बापलेकांविरुद्ध विनयभंग, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका गावातील २५ वर्षीय विवाहित महिला ही २७ मे रोजी दुपारी १२.३० वाजता घरी एकटीच होती. हीच संधी साधून आरोपी उत्तरेश्वर नामदेव दोडके ( रा. माळेगाव ता. केज ) याने घरात घुसून पीडित महिलेचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा करून आरोपीच्या तावडीतून सुटका केली. हा घडलेला प्रकार माहीत झाल्यानंतर आरोपीचा वडील नामदेव दोडके यांनी पीडितेस शिवीगाळ करून हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून आरोपी उत्तरेश्वर दोडके, नामदेव दोडके या दोघा बापलेकांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात विनयभंग, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे पुढील तपास करत आहेत.
तर अन्य एका घटनेत एका २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून दगडाने मारहाण केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका तरुणासह त्याच्या आईवडीलांवर गुन्हा दाखल झाला आहे.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २६ वर्षीय विवाहित महिला ही २८ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील बोअरजवळ उभी होती. यावेळी आरोपी विकास अनिल भवलकर ( रा. शिरूरघाट ता. केज ) याने लज्जास्पद बोलून तू माझ्यासोबत चल’ असे म्हणाला असता पीडित महिलेने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या विकास याने पीडितेस शिवीगाळ करून आज तुला घेऊनच जाणार आहे असे म्हणुन वाईट हेतुने हाताला धरल्याने पीडित महिलेने आरडाओरड केल्याने आरोपीने तिचा गळा दाबुन तु जर ओरडलीस तर तुला जिवेच मारून टाकतो अशी धमकी देत विनयभंग केला. डाव्या हाताच्या खुब्यावर दगड मारून मुकामार ही दिला. पीडितेचा ओरडण्याचा आवाज ऐकुन तिच्या मदतीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना आरोपीचे वडील अनिल दगडू भवलकर व आई सत्यभामा अनिल भवलकर यांनी चापटाबुक्क्याने मारहाण करून मुकामार दिला. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून विकास भवलकर, अनिल भवलकर, सत्यभामा भवलकर या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक आशा चौरे या पुढील तपास करत आहेत.