केज दि.२९ – तालुक्यातील मांगवडगाव शिवारातील विहिरीत शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एका अंदाजे ४५ वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्याप मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
मांगवडगाव येथील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अंदाजे ४५ वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. परिसरात दुर्गंधी सुटल्याने विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर हा मृतदेह निदर्शनास आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, पोलीस नाईक परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच चिंचोली ( माळी ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव सांगळे हे रात्री शवविच्छेदन करीत होते. मृतदेहाची ओळख पटली नसून सदर इसमाने आत्महत्या केली की घातपात करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला हे पोलीस तपासात निष्पन्न होईल.
दरम्यान, मृतदेह आढळून आलेला शिवार हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहराच्या सीमेजवळ येत असल्याने कळंब ठाण्यात मिसिंगची नोंद असलेल्या इसमाशी ओळख पटते का? हे तपासले जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी सांगितले.