पुणे दि.30 – यंदा मान्सून वेळेत दाखल होईल, अशी शक्यता काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्रातील मान्सुन लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ आणि माजी आयएमडीएचे प्रमुख डाॅ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात पावसाचा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे.
हवामानाची बदललेली परिस्थिती लक्षात घेता केरळमध्ये यंदा मान्सुन 3 जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सुनचं आगमन 4 ते 5 दिवस उशिराने होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ के.एस होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. यापुर्वी केरळमध्ये मान्सुन 1 जूनला दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण हवामानतज्ज्ञ के.एस होसाळीकर यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, आता 3 जूनला केरळमध्ये मान्सुन धडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान दरवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. शिवाय, राज्यातील सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता नियोजित वेळेपेक्षा 4 ते 5 दिवस उशिराने मान्सुन महाराष्ट्रात दाखल होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासुन मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावल्याचं दिसून येत आहे.