मुंबई दि.30 – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊन लागू केला. त्यानंतर वेळोवेळी या लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. 1 जूनला महाराष्ट्रातील लॉकडाऊन उघडण्याची चिन्हं दिसत असतानाच पुन्हा 15 दिवस त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधतांना दिली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल तर काही जिल्ह्यात आणखी कडक केले जातील, असं त्यांनी सांगितलं आहे.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी गेली दीड वर्ष तुम्ही जी बंधनं पाळत आहात, त्यासाठी मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, असं महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून म्हटलं आहे. तसेच जनतेवर निर्बंध लादणं हे वाईट आहे, पण नाईलाजास्तव जनतेच्या सुरक्षेसाठी आपल्याला ते करावं लागत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.राज्य सरकारतर्फे आत्तापर्यंत 55 लाख मोफत शिवभोजन थाळ्यांचं वितरण करण्यात आलं आहे. तसेच आत्तापर्यंत 2 लाख 74 हजार मेट्रिक टन धान्य अन्न सुरक्षा योजनेतंर्गत वितरित करण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 850 कोटी रुपये जमा केले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
दरम्यान महाराष्ट्रात आता कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केलं. तसेच येत्या 15 दिवसात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येणार असून काही भागात शिथिलता देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन आता 15 दिवसांनी वाढणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.