मुंबई दि.31 – 1 जूनला महाराष्ट्रातील लॉकडाऊन उघडण्याची चिन्हं दिसत होती. मात्र काही भागात पुन्हा रूग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधतांना दिली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल तर काही जिल्ह्यात आणखी कडक केले जातील, असं त्यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळी परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून वेगवेगळी नियमावली आखण्यात आली आहे.
10 टक्के पेक्षा कमी रूग्णसंख्या आहे त्या जिल्ह्यासाठी खालील नियम असतील-
1. अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ही दुकानं बंद राहतील.
2. अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
3. सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. कृषीविषयक दुकानं आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.
20 टक्के पेक्षा जास्त रूग्णसंख्या आहे त्या जिल्ह्यासाठीखालील नियम असतील-
1. या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
2. दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.
3.प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे चे ब्रेक द चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी गेली दीड वर्ष तुम्ही जी बंधनं पाळत आहात, त्यासाठी मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, असं महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून म्हटलं आहे. तसेच जनतेवर निर्बंध लादणं हे वाईट आहे, पण नाईलाजास्तव जनतेच्या सुरक्षेसाठी आपल्याला ते करावं लागत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं आहे.