Site icon सक्रिय न्यूज

कडब्याच्या गंजीत लपवून ठेवले होते गांजा चे पोते…….!

कडब्याच्या गंजीत लपवून ठेवले होते गांजा चे पोते…….!
कळंब दि.1 – तालुक्यातील मस्सा ख. गावच्या शिवारात सव्वा कोटी रुपयांचा 1132 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. एका छोट्या गावात इतका गांजा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मस्सा येथील गट नं 675 वरील बालाजी शिंदे यांचे शेत बालाजी छगन काळे आणि राजेंद्र उर्फ दादा छगन काळे हे दोघे बटईने करत होते. त्याच शेतात त्यांनी आर्थिक फायद्यासाठी कोठूनतरी गांजा विक्रीसाठी आणून ठेवला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
                        स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत शेतातील कडब्याच्या गंजीत ताडपत्री झाकून ठेवलेले 47 पांढरे पोते आढळून आले. पोलिसांनी पोते उघडून पाहिल्यास त्यात गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्याने बालाजी काळे आणि राजेंद्र काळे दोघे जण फरार झाले. पोलीस उपनिरीक्षक निलंगेकर यांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केले. कळंब पोलीस स्टेशनमध्ये आणून पोत्यांचं वजन करण्यात आलं. प्रत्येकी 50 ग्रामचे एक सॅम्पल सीए टेस्टसाठी आणि पोलीस स्टेशनसाठी राखीव म्हणून एक सॅम्पल काढून घेण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या 47 पोत्यांचं वजन केल्यानंतर एकूण 1132.66 किलो गांजा असल्याचे समोर आले. ज्याची एकूण किमंत 11000 रुपये किलोप्रमाणे 1 कोटी 24 लाख 59 हजार 260 रुपये इतकी आहे. गांजा विक्री किंवा बाळगणे हा कायद्याने गुन्हा असताना कोट्यवधी रुपयांचा गांजा सापडल्याने उस्मानाबाद जिल्हा हादरला आहे. गुन्हे शाखेने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक निलंगेकर, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, बबन जाधवर, अविनाश मारापल्ले या पथकाने केली.
                दरम्यान रात्री उशिरा कळंब पोलिसात उपनिरीक्षक पांडुरंग माने यांच्या फिर्यादीवरून बालाजी काळे आणि राजेंद्र काळे यांच्या विरोधात एन.डी.पी.सी ऍक्ट कलम 20 ब,ii (C) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
शेअर करा
Exit mobile version