Site icon सक्रिय न्यूज

राज्यातील निर्बंध शिथिल नाहीत, टप्पे निहाय प्रस्ताव विचाराधीन…..!

राज्यातील निर्बंध शिथिल नाहीत, टप्पे निहाय प्रस्ताव विचाराधीन…..!
मुंबई दि ३ – मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर संभ्रम निर्माण केल्यामुळे ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षानेही ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. या सर्व प्रकरणात सारवासारव करताना विजय वडेट्टीवार यांनी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील मी फक्त तत्वतः हा शब्द वापरायचा विसरलो, असं म्हणत वेळ मारून नेली. मात्र जनतेत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. तर कांही वेळातच सीएमओ कार्यालयातून स्पष्टीकरण आले.
              अधिकृत स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की,  कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.
                                 अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version