Site icon सक्रिय न्यूज

पालकांनो अशी घ्या लहान मुलांची काळजी……!

पालकांनो अशी घ्या लहान मुलांची काळजी……!

मुंबई दि.४ – कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट देखील लवकरच धडकणार आहे, असं बोललं जात आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यासाठी सरकार बालरोग तज्ज्ञांच्या मदतीने विविध उपाय योजना करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर आता मुलांना कोरोना होऊ नये म्हणून किंवा कोरोना झाल्यानंतर पालकांनी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

नुकत्याच केलेल्या सिरो सर्व्हेत 25 टक्के लहान मुलं कोरोनाग्रस्त आढळून आली आहेत. अगदी 10 वर्षे वय असणाऱ्या मुलांमध्येही मोठ्या माणसांप्रमाणे संसर्ग आढळून आला आहे. संख्येकडे पाहिलं तर दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढल्याचं दिसून आली आहे. त्यामुळे आगामी काळात लहान मुलांची जास्त काळजी घेतली पाहिजे, असं मत डॉ. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केलं आहे.

मुलास जर श्वास घेण्यास त्रास होत असेल, गंभीर स्वरुपाच्या खोकल्यामुळे मूलं दूध पिऊ शकत नसतील, हायपोक्सिया किंवा तीव्र ताप असेल, त्वचेवर लालसर चट्टे उठले असतील, जास्त वेळ झोपून राहणं किंवा कोणतीही असामान्य लक्षणं दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा, असं डॉ.अरोरा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 2 वर्षांखालील मुलांना मास्क न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पहिली पाच वर्षे महत्त्वाची असतात. त्यामुळे त्यांनी घरात राहणं गरजेचं आहे. आपल्या बाळाला स्तनपान देत असलेल्या महिलांनी लस घेणं सुरक्षित आहे. त्यामुळे अशा महिलांनी देखील लस घ्यावी,असा सल्ला देखील डॉ. अरोरा यांनी दिला आहे.

शेअर करा
Exit mobile version