मुंबई दि.5 – शेतकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहत होता ती वेळ अखेर आली आणि मान्सून राज्यामध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. शेतकऱ्यांची सध्या खरिपाच्या हंगामासाठी लगबग सुरू आहे. तीन जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. आता मान्सूनने राज्यातही हजेरी लावली आहे त्यामुळे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात शेतीच्या कामाला वेग आला आहे. मुंबई हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत आहे. तसेच द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर , मराठवाडा आणि काही सलग्न भागात मान्सूनच्या जोरदार सारी बरसतील. तसेच मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठीदेखील अनुकुल वातावरण आहे अशी माहिती मुंबई हवामान विभागाने दिली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मान्सूनची वाटचाल पुढे मध्य अरबी समुद्राच्या अधिक भागात, संपूर्ण तटीय कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, उत्तर अंतर्गत कर्नाटकातील बहुतेक भाग, तेलंगणा व आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापणारी आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून जोरदार बरसणार असल्याची माहिती दिली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार यंदा कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसा पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.