Site icon सक्रिय न्यूज

मराठा समाजाला वेठीस धरू नका, छत्रपती संभाजी राजेंचा रायगडावरून इशारा……!

मराठा समाजाला वेठीस धरू नका, छत्रपती संभाजी राजेंचा रायगडावरून इशारा……!

रायगड दि.६ – खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. मी राजकारणी नाही, मी राजकारण करत नाही. पण मधल्या काळात लोक माझ्यावर नाराज झाले. पण मला समाजाला वेठीस धरायचं नाही. धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच चुकलो असेल तर मी दिलगिर आहे, असं संभाजी राजे यांनी सांगितलं. 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी ही भूमिका व्यक्त केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावार अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवाल दिला आहे. काही शिफारशी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका, असं आवाहन त्यांनी केलं.तसेच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जूनपासून हे आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाच संभाजी छत्रपती यांनी केली.

शेअर करा
Exit mobile version