केज दि.९ – तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींच्या नरेगा कामात घोटाळा झाल्याचे चौकशीत आढळून आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दहा फेब्रुवारी रोजी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागवला होता. उत्तरादखल प्राप्त खुलाशांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या चार सदस्यीय पथकाने ८ जून रोजी केज पंचायत समिती कार्यालयात नरेगा कामातील कागदपत्रांची तपासणी केली. तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीची चौकशी व दोषींवर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार आणि अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींमधील नरेगा कामांची चौकशी नियुक्त केलेल्या पथकाने केली होती. यामध्ये १०८ ग्रामपंचायतींमध्ये केलेल्या कामात अनियमितता आढळून आली. दोषी कर्मचाऱ्यांत दोन गटविकास अधिकारी, पाच शाखा अभियंता, दोन विस्तार अधिकारी, १०८ सरपंच, १०८ रोजगार सेवक व ६९ ग्रामसेवकांचा समावेश होता. दि. १० फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत खुलासा मागितला होता.
यातील तीस ग्रामपंचायतींनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्या खुलाशातील कागदपत्रे व अभिलेख्यांची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, नरेगाचे गटविकास अधिकारी जोगदंड व कॅफो जटाळे यांचा समावेश असणारे पथक पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. दररोज दहा अशा तीस ग्रामपंचायतींच्या कागदपत्रांची तीन दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी कांबळे यांनी दिली आहे.
दरम्यान मस्साजोग, काळेगाव घाट, आरणगाव, धोत्रा, टाकळी, कोरडेवाडी, गोटेगाव, काशिदवाडी, येवता, घाटेवाडी, विडा, उमरी, केळगाव, बेळगाव, जोला, सांगवी (सारणी), सारणी (सांगवी), सारूळ, आंधळेवाडी, देवगाव, पिराचीवाडी, लिंबाचीवाडी, बनकरंजा, चंदनसावरगाव, होळ, बोरीसावरवरगाव, एकुरका, नांदुरघाट, दरडवाडी, युसूफवडगाव व सारणी (आनंदगाव) इत्यादी गावांचा समावेश असून या ग्रामपंचायतीच्या कामांशी संबंधित सरपंच, ग्रामरोजगार सेवक, संगणक ऑपरेटर, सहायक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहायक यांना खुलाशासह संपूर्ण कागदपत्रे व अभिलेखे घेऊन पंचायत समिती कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.