अंबाजोगाई दि.९ – आयएमए अर्थात इंडियन मेडीकल असोशिएशन शाखा अंबाजोगाईने सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून सामाजिक दायित्व पार पाडले आहे. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्याचा लाभ समाजातील विविध घटकांना झाला पाहिजे हा आयएमए अंबाजोगाईचा प्रयत्न असतो. त्याच अनुषंगाने कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक घटकाचा उपयोग झालेला आहे. जे नुकतेच वैद्यकीय पदवी परिक्षेत उत्तीर्ण झालेले आहे. अशा तरूण डॉक्टरांना सोबत घेवून कोरोनाची ही लढाई लढलेली आहे. या तरूण डॉक्टरांनी व वैद्यकीय कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता या राष्ट्रीय कामात स्वतःला झोकून दिले. अशा तरूण डॉक्टरांचा सन्मान अंबाजोगाई आयएम बुधवार दि. 9 जून रोजी लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये आयोजित केला होता.
यावेळी डॉ.सिद्धेश्वर बिराजदार म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेमध्ये महत्वाची भूमिका ही डॉक्टरांची व वैद्यकीय कर्मचार्यांची राहिलेली आहे. पाठीमागे कसलाही अनुभव नसताना देखील ही लढाई लढलेली आहे. समाजाने सत्य स्विकारून घेतले पाहिजे. डॉक्टरांनी ज्या पद्धतीने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. त्याची उतराई भले ही केली नाही तरी चालेल परंतु डॉक्टरांविषयीचा मनातील समज गैरसमज दुर करून संवेदना दाखवावी असे भावनिक आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून स्वाराती रूग्णालयाचे मेडीसिन विभाग प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, लोखंडी येथील कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रकांत चव्हाण, डॉ.अरूणा केंद्रे, बालरोग तज्ञ डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.गोपाळ पाटील, डॉ.विजय लाड, डॉ.संदीप मोरे, डॉ.बजाज, डॉ.शेख जुबेर, डॉ.सचिन पोतदार यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते.आयएमए संघटनेच्या वतीने लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये ज्यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली अशा तरूण डॉक्टरांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कोरोनाची दुसरी लाट ही ऐतिहासिक ठरली. कारण ही लाट अत्यंत जोखमीची होती. मोठ्या प्रमाणात रूग्ण संख्या असल्याने अनेक संकटाचा सामना करावा लागला. कधी ऑक्सिजन बेड तर कधी रेमडिसीव्हर इंजेक्शनची कमतरता जाणवत होती. प्राणाची बाजी लावून लढण्याची तयारी सर्वांची होती. मात्र प्रासंगीक अडचणीमुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले.
लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमुळे जवळपास साडेचार हजार रूग्ण कोरानामुक्त झाले. तर केवळ 47 रूग्णांचा या ठिकाणी मृत्यू झाला.रिकव्हरी रेट चांगला होता. डॉ.चंद्रकांत चव्हाण व डॉ.अरूणा केंद्रे या दोनही डॉक्टरांनी या भागात चांगले काम करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. आयएमए अंबाजोगाईने डॉक्टरांच्या सन्मानार्थ दोन पाऊल पुढे टाकत तरूण डॉक्टरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला. कारण हे तरूण डॉक्टर म्हणजे जे की, नुकतेच वैद्यकीय परिक्षा उत्तीर्ण झालेले होते. ज्यांना अनुभव नव्हता केवळ पुस्तकी शिक्षा आणि प्रॅक्टीकल वर्क होते. अशा हातांनी या कामात पुढाकार घेवून आपले कर्तव्य अदा केले. या तरूण डॉक्टरांच्या कर्तृत्वाचे उपस्थितांनी कौतुक करून शबासकीची थाप पाठीवर मारली. सामाजिक कर्तव्य म्हणून आयएमएने सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवून त्यांना सामाजिक बांधिलकीचे कंकण बांधले.
यावेळी डॉ.शेख जुबेर, डॉ.संदिप मोरे, डॉ.सचिन पोतदार, डॉ.जाधव, डॉ.गालफाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यांचा मान्यवरांनी सत्कार केला. तर या कार्यक्रमात डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.चंद्रकांत चव्हाण, डॉ.गोपाळ पाटील, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.विजय लाड आदींनी मनोगत व्यक्त करून कोरोनामध्ये काम केलेल्या डॉक्टरांचे कौतुक केले. तर डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांनी या तरूण डॉक्टरांना मार्गदर्शन करताना सांगितले. की, आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत. ते क्षेत्र खुप वेगळे आहे. कारण समाज सेवेचे व्रत या ठिकाणी प्रामाणिकपणे अदा करावे लागते. कारण या ठिकाणी इतर क्षेत्रासारखे गाफिल किंवा दुर्लक्ष करून चालत नाही. आपली एक चुक एखाद्याचे आयुष्य हे संपवू शकते त्यामुळे आपण सुद्धा काळजीपुर्वक आणि जबाबदारीने काम केले पाहिजे. आपल्या कामातूनच आपल्याला समाधान मिळत असते. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना पुण्य लाभत असते कारण या ठिकाणी काम करणारा प्रत्येक डॉक्टर हा दुसर्या जीवासाठी लढत असतो. आणि धडपडत असतो. त्यामुळे या तरूण डॉक्टरांनी केलेले काम हे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. तुम्ही तुमचे निष्ठेने अदा केले आहे. भविष्यात ती जबाबदारी आणखी वाढणार आहे. त्यामुळे समाजाने सुद्धा डॉक्टरांच्या विषयी जे मनात समज गैरसमज असतात त्याला तिलांजली देत आम्ही कशा पद्धतीने काम करत आहोत. याचा विचार करण्याची गरज आहे. कारण योद्धा जसा सिमारेषेवर लढत असतो तसचं आम्ही रूग्णालयात रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी आकाश पाताळ एक करत असतो. परंतु समाजात विनाकारण डॉक्टरांविषयी गैरसमज पसरविलेला असतो. तो गैरसमज दुर करून आम्ही सुद्धा एक घटक आहोत. याचा विचार करून सलोख्याचे व आपलेपणाचे वर्तन अपेक्षीत आहे. या तरूण डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा देत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.रोशणी चांडेल व डॉ.मुकुंद चाट तर आभार प्रदर्शन डॉ.किशोर हजारे यांनी केले. या कार्यक्रमात कोविड सेंटरमध्ये ज्यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली अशा परिचारीका , चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कामगार इतरांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.