Site icon सक्रिय न्यूज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसैनिकांना पत्र……!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसैनिकांना पत्र……!

मुंबई दि.११ – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे. राज्यात कालच एका दिवसात 12,207 रुग्ण सापडले आहेत. तर दीड लाखाहून अधिक रुग्ण उपचार घेत आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं आहे. त्यांनी हे पत्रक ट्विटरही टाकलं आहे. येत्या 14 जून रोजी राज यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवशी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये म्हणून राज यांनी हे आवाहन केलं आहे. हे आवाहन करताना त्यांनी मनसे सैनिकांना राज्यातील कोरोना परिस्थिती आणि कोरोनामुळे होणाऱ्या धोक्याची सूचना देऊन काळजी घेण्याचं कळकळीचं आवाहनही केलं आहे.

दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो.तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल 12,207 नवे रुग्ण सापडले आणि 1,64,743 जण आत्ताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.

हे वातावरणच असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, जिथे आहात, तिथे सुरक्षित राहा. आपल्या कुटुंबियांची, आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही असं नको व्हायला. तुम्ही सर्वांनी ह्या कोरोना काळात जागरुकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला फार अभिमान आहे. अशाच कामात राहा, अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवाने आपल्याला सोडून गेलं. तसंच कुणाचे रोजगार गेले, त्या सर्वांना धीर द्या, त्यांच्यासाठी आता करता आहात तसंच काम करत राहा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा.थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणाविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच. तोपर्यंत जिथे आहात तिथेच पूर्ण काळजी घेऊन कामात रहा. महाराष्ट्राला आता आपल्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात रहा. त्याच मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्विकारीन.

लवकरच भेटू.

आपला नम्र,

राज ठाकरे

शेअर करा
Exit mobile version