औरंगाबाद दि.११ – गरज पडली तर सवलत दिली जाईल, मात्र वीजबिल माफ होऊ शकत नाही. सार्वजनिक कंपन्या चालवण्याला पैसे लागतात, त्यामुळं वीज बिल भरावं लागेल, वीज बिल माफ करण्याचं काम केंद्र सरकारचं आहे, केंद्र सरकारने मदत केली तर राज्य सरकारही पुढं येईल, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.गाव तांडे जे विजेपासून वंचित आहेत, तिथं वीज पोहोचवण्याचं काम आम्ही हातात घेतोय. काही ठिकाणी पोहोचणं कठीण आहे, मात्र आम्ही धोरण ठरवलं आहे, त्यानुसार वीज देऊ, असा निर्धार नितीन राऊतांनी व्यक्त केला आहे.
आता नवीन औष्णिक प्रकल्प नाही, जे आहेत ते सुरू राहतील. पुढं औष्णिक प्रकल्प नाही. सौर ऊर्जेवर जोर देऊया त्यातून फायदा होईल, रोजगार मिळेल, असा विश्वासही नितीन राऊतांनी व्यक्त केला.
दरम्यान,गुप्त बैठकीचे अनेक सूर असतात, हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. तिन्ही पक्ष सोबत काम करतील, सरकार पडणार नाही. आम्ही पूर्ण काम करणार, जोरात करणार, आम्ही एक आहोत म्हणून चांगलं काम होतंय, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.