Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण…..!

बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण…..!
बीड दि.११ – नेकनूर पासून जवळच असलेल्या बीड तालुक्यातील कळसंबर शिवारात बिबट्या वावरत असल्याचा विडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे सदरील परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाची टीम दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.
          मागच्या वर्षी पाटोदा, आष्टी परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला होता. यामध्ये अनेकांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले होते. स्थानिक तसेच औरंगाबाद येथील रेस्क्यू टीम ने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सदरील परिसरात तळ ठोकला होता. मात्र कांही दिवसांनी बिबट्याने त्या परिसरातून काढता पाय घेतला व तोच बिबट्या करमाळा परिसरात ठार केल्याचे सांगण्यात आले. आणि आता पुन्हा बीड जिल्ह्यात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे.
          बीड तालुक्यातील कळसंबर शिवारातील एका उसाच्या शेतात बिबट्या असल्याचे सदरील विडिओ क्लिप मध्ये दिसून येत असून परिसरात गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
           दरम्यान यामध्ये एकावर हल्ला करून जखमी केल्याचे सांगितल्या जात असून सदरील घटनेची माहीती मिळताच एपीआय लक्ष्‍मण केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, खांडेकर ,डोंगरे यांनी धाव घेऊन  शेतातील नागरिकांना दूर केले .सुरुवातीला वाघ असल्याचे बोलले गेले मात्र वन विभागाचे वनाधिकारी अमोल मुंडे , दिनेश मोरे ,अच्युत तोंडे , दाखल झाले त्यांनी तो बिबट्या असल्याचे ओळखले मात्र हा बिबट्या  हुलकावणी देत बाजूच्या जेतळवाडीच्या दिशेने पळाला बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील अनेक गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
शेअर करा
Exit mobile version