केज दि.११ – लघुशंकेसाठी घराच्या पाठीमागे गेलेल्या महिलेवर दोघा भावांनी शेतात ओढत नेत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत विचारणा शिवीगाळ करीत करण्यास गेलेल्या पीडित महिलेच्या नातेवाईकास कोयत्याने व काठीने हल्ला करून नाकाचे हाड मोडल्याची घटना युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी दोघा भावांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही शेत वस्तीवर वास्तव्यास असून ती ९ जून रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास झोपेतून उठून लघुशंकेसाठी घराच्या पाठीमागे गेली होती. तिच्या सोबत कोणीच नसल्याची आणि तिचे नातेवाईक ही झोपेत असल्याची संधी साधून आरोपी संतोष मारोती सोनवणे व भास्कर मारोती सोनवणे या दोघा भावांनी वाईट हेतुने शेतात ओढत नेत पीडित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत तिची छेडछाड केली. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पीडित महिलेने घरी येऊन तिच्यासोबत घडलेल्या प्रकारची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर या प्रकाराबाबत तिच्या नातेवाईकाने विचारणा केली असता भास्कर सोनवणे याने कोयत्याने नाकावर मारून नाकाचे हाड मोडले. तर प्रभावती भास्कर सोनवणे, अशोक भास्कर सोनवणे यांनी शिवीगाळ करीत काठीने व दगडाने बेदम मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून संतोष सोनवणे, भास्कर सोनवणे, प्रभावती सोनवणे, अशोक सोनवणे या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस नाईक चौरे हे करीत आहेत.