सोलापूर दि.१४ – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन केल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा आज स्पष्ट केली. यावेळी त्यांनी 36 जिल्ह्यात मेळावे घेणार असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर 26 जून रोजी औरंगाबादेत मेळावा, 27 जून रोजी मुंबईत 10 हजार बाईकची रॅली काढण्याची घोषणा केलीय. इतकंच नाही तर 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
5 जून रोजी बीडमधून मराठा आंदोलनाला सुरुवात करण्यात आलीय. मराठा आरक्षणाबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी सध्या आपण दौऱ्यावर आहोत. 26 जूनला औरंगाबादेत मेळावा घेणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं. तसंच 36 जिल्ह्यात आपण मेळावे घेणार आहोत. विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. 27 जून रोजी मुंबईत तब्बल 10 हजार बाईकची रॅली काढण्यात येणार आहे. 5 जुलैपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न सुटले नाहीत तर 7 जुलैचं पावसाळी अधिवेशन रोखण्याचा इशाराही मेटे यांनी यावेळी दिलाय.
नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला पाठिंब्याचं दिलेलं पत्र हे राज्य सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. नक्षलवाद्यांच्या सहानुभूतीच्या जाळ्यात मराठा समाजातील पिचलेले तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीनं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होईल. अशावेळी नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकाबाबत सरकारकडून एकही प्रतिक्रिया येत नाही हे दुर्दैव असल्याची टीकाही मेटे यांनी केली आहे.तसेच काँग्रेसच्या मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे ती काढायची झाल्यास अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा. त्यांना हाकलेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशी घोषणाच मेटे यांनी बीडमधून केली होती. मराठा समाज्याच्या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने 3 दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल केली. पण महिना उलटून गेला तर राज्य सरकारने काहीही केलं नाही, अशी टीका करताना तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करा, अशी मागणी मेटे यांनी केली होती.