केज दि.१४ – जालना येथून सोयाबीन, उडीद पिकाचे बियाणे घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी चालत्या पिकअपमधून २० हजार १०० रुपयांचे बियाणे लंपास केल्याची घटना केज जवळ घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जालना येथील बियाण्याच्या कंपनीतून पिकअप चालक भाऊसाहेब काशीनाथ शिंदे ( रा. बनगाव ता. अंबड ) हे पिकअपमध्ये ( एम. एच. ०४ एफपी २१८६ ) सोयबीन पिकाच्या बियाण्याच्या ११० गोण्या व उडीद बियाण्याचे १० पोते भरून लातुर येथे निघाले होते. १३ जून रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास केज – मांजरसुंबा रस्त्यावरील नव्याने होत असलेल्या टोल नाक्याजवळ वाहनाची गती कमी होताच अज्ञात चोरटे पिकअपवर चढले. त्यांनी पिकअपवरील ताडपत्री फाडून पिकअपमधील सोयाबीन बियाण्याचे तीन पोते ( किंमत ८ हजार ४०० रुपये ) व उडीद बियाण्याचे तीन पोते ( किंमत ११ हजार ७०० रुपये ) असा २० हजार १०० रुपयांचे बियाण्याचे पोते अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
दरम्यान पिकअप चालक भाऊसाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.