Site icon सक्रिय न्यूज

रुग्णसेवा करणाऱ्या कोविड कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या……!

वडवणी दि.16 – गेल्या दीड वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून संपूर्ण जगामध्ये covid-19 या विषाणूने थैमान घातले असून, कोरोना सारखा आजार आला. महाभयंकर जागतिक महामारीने हाहाकार माजवला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये देशातील व राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर  खूप मोठे आव्हान निर्माण झाले होते. आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी पडत होते. मात्र अशा भीतीदायक वातावरणात देखील अनेक गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींनी डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय च्या भूमिकेतून आपल्या जीवाची कसलीही परवा न करता रुग्णसेवा केली, रुग्णांची संपूर्ण काळजी घेतली.
         रुग्णसेवा करत असताना अनेक कर्मचारी देखील कोरोनाग्रस्त झाले तर काही कर्मचाऱ्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यूदेखील झाला. तरीही न डगमगता आपली रुग्णसेवा चालूच ठेवली. मात्र अलीकडच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक कोविड सेंटर बंद पडले असून, कोविड सेंटरमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकले आहे. तर आणखी काही सेंटर बंद पडण्याची शक्यता असून नंतर तेथील कर्मचाऱ्यांना देखील सेवेतून कमी करण्यात येणार आहे.
            जागतिक महामारी मध्ये गरज असताना देशसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. त्यांनी रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून रुग्णांना मानसिक आधार दिला व त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली हे कौतुकास्पद आहे. मात्र आज त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात सेवेतून कमी केल्यामुळे बेरोजगारीची वेळ आली आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे अशा परिस्थितीत सरकारने त्यांना आरोग्य विभागातील रिक्त पदांवर कायम सेवेत समाविष्ट करून घ्यावे. अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेअर करा
Exit mobile version