Site icon सक्रिय न्यूज

ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार…..!

ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार…..!

मुंबई दि.16 – आरक्षणासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. उद्या गुरुवारी समता परिषदेने ‘ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’चं आयोजन केलं आहे. समता परिषदेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्या गुरुवारी होणाऱ्या मोर्चाची माहिती दिली. आम्ही उद्या ओबीसींचा आक्रोश मोर्चा काढणार आहोत.हा मोर्चा केंद्र किंवा राज्य सरकारच्या विरोधात नाही. ओबीसी आरक्षणावर कोणीच काही बोलताना दिसत नाही. या आरक्षणावर केंद्राने मार्ग काढावा, राज्याने मार्ग काढावा किंवा कोर्टाने मार्ग काढावा… कोणीही मार्ग काढावा पण आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र, सध्या या आरक्षणावर कोणीच काही बोलताना दिसत नाही. सर्व काही शांतता आहे. जणू काही घडलंच नाही असं वातावरण आहे, त्यामुळेच हा मोर्चा काढला जात असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

राजकीय आरक्षण गेली पंचवीस वर्षे राज्यात लागू आहे. त्यामुळे साडे तीनशे लहान जातींना राजकारणात संधी मिळत होती. शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं. त्यांनी मंडल आयोग लागू केला होता, असं ते म्हणाले. 4 मार्च रोजी ओबीसी आरक्षणावर कोर्टाचा निकाल आला. तेव्हा कोरोना सुरू होता. तरीही आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण कोर्टाने ऐकलं नाही. कोर्टाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 50 ते 60 हजार जागांवर परिणाम होणार आहे. हा केवळ एका राज्याचा प्रश्न नसून देशव्यापी प्रश्न आहे, असा दावा त्यांनी केला.

मुंबई महापालिका ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत. त्यात ओबीसी आरक्षण आहे की नाही? असा सवाल करतानाच ओबीसींचा डेटा गोळा करू, पण कोरोनाचा काळ आहे. घरोघरी जाऊन सर्व्हे कसा करणार?, असा सवाल त्यांनी केला. भाजपने मोर्चा काढला. टीका केली ठिक आहे. भाजप या प्रश्नावर आक्रमक आहे हे पुरेसे आहे. पण समता परिषद अध्यक्ष म्हणून माझ्यावरही काही जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही उद्या आंदोलन करत आहोत. पण हे आंदोलन केंद्र किंवा राज्याच्या विरोधात नाही. आमचा आक्रोश आम्ही मांडणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

                    आणि याच आंदोलनाचा एक भाग म्हणून समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार गुरुवार दि. १७ जून २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास चौक, जालना रोड, बीड येथे भव्य आक्रोश आंदोलनाचा एक भाग म्हणून रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी दिली असून या रास्ता रोको आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाज बांधवांनी आणि समता परिषदेच्या पदाधिकारी व समता सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन देखील ऍड. सुभाष राऊत यांनी केले आहे.

शेअर करा
Exit mobile version