उस्मानाबाद दि.16 – पैसे रस्त्यावर पडलेले दिसले, काही इतर मौल्यवान वस्तू दिसल्या कि माणूस आपल्या हक्काने त्यास घरी घेऊन जातो. याचे ताजे प्रकरण महाराष्ट्रातील उस्मानाबाद मध्ये घडले आहे. जेथे ट्रक पलटी झाल्यावर, तेथील ग्रामस्थांनी आणि वाटेने जाणाऱ्या लोकांनी सुमारे ७० लाखांचा माल लुटल्याचा आरोप झाला आहे. ट्रकमध्ये टीव्ही, मोबाइल फोन सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे सांगण्यात आले. आता पोलिसांकडून हा माल लोकांकडून परत करण्यासाठी मोहीम सुरू आहे.
कोंबड्यांपासून मद्यापर्यंत तसेच खाण्या-पिण्याच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे अपघात होत असतात. याबद्दलची माहिती द्यायची सोडून त्यांची पळवापळवी होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. या प्रकारेच उस्मानाबादमध्ये ट्रक उलटल्यानंतर त्यातील इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघाताच्या ठिकाणाहून पादचारी आणि गावकऱ्यांनी तब्बल ७० लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा दावा केला जात आहे. ही महाग उपकरणे परत मिळवण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.
सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. “ट्रकमध्ये मोबाईल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही, खेळणी अशी विद्युत उपकरणांची निर्यात सुरु होती. अपघात झाल्यानंतर ट्रकमधील सर्व वस्तू रस्त्यावर पडल्या, तेव्हा आसपासच्या गावकऱ्यांची त्या वस्तू उचलण्यासाठी झुंबड केली. काही जणांनी तर कंटेनरचा दरवाजा उघडून वस्तू पळवून लावल्या. यासाठी स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं.” अशी माहिती ट्रक चालकाने दिली आहे.
दरम्यान काही जणांनी वस्तू पोलिसांच्या आवाहनानंतर परत केल्या. त्यानंतर उर्वरित वस्तू शोधण्यासाठी पोलीस गावात सर्वत्र हिंडू लागले. या अपघातादरम्यान ७० लाखांच्या वस्तू लुबाडल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी ४० टक्के वस्तू परत मिळाल्याची माहिती आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे याबाबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी माहिती दिली आहे.