मुंबई दि.१८ – संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांमध्ये होत असलेली गर्दी पाहता कोरोनाची तिसरी लाट येत्या दोन ते चार आठवड्यांत राज्यावर आदळू शकते, असा गंभीर इशारा कोविड टास्क फोर्सने दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीत टास्क फोर्सने तिसर्या लाटेचा अंदाज देणारे सादरीकरण केले. गेल्या दोन आठवड्यांमध्ये राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध काही अंशी शिथिल केल्यामुळे 15 जिल्ह्यांसह नागपूर आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांतही पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. मास्क न वापरणे, अनावश्यक प्रवास टाळणे या गोष्टी धाब्यावर बसवण्यात येत असल्याने तिसर्या लाटेची चिंता वाढल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. ब्रिटनमध्ये उन्हाळ्यात बाजारपेठा खुल्या करण्यास सुरुवात झाली होती. मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोरोनाचे निर्बंध पूर्णतः उठवणे आता महिनाभर लांबणीवर टाकण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये दुसरी लाट ओसरण्यापूर्वीच तिसरी लाट आली. महाराष्ट्रात आपण खबरदारी घेतली नाही, कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर ब्रिटनप्रमाणेच महाराष्ट्रालाही या तिसर्या लाटेशी लढावे लागेल, असे कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे.
तिसर्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याची आरोग्य विभागाने भीती वर्तवली असून पहिल्या लाटेत 19 लाख रुग्ण होते. दुसर्या लाटेत ही संख्या 40 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्णसंख्या परत दुपटीने वाढू शकते. तर पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्णसंख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस स्ट्रेन/व्हेरीयंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आक्रमक असू शकेल. सध्या दुसर्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या 1.4 लाखाच्या आसपास आहे. तिसर्या लाटेत ही संख्या 8 लाखांवर पोहोचू शकते.
दरम्यान तिसर्या लाटेत सापडणार्या एकूण रुग्णांमध्ये 10 टक्के प्रमाण मुले आणि तरुणांचे असेल. कनिष्ठ मध्यम वर्गाला कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांचे तडाखे बसले नाहीत. मात्र तिसर्या लाटेत हाच वर्ग कोरोनाच्या टार्गेटवर असेल. कारण या वर्गात प्रतिजैवकांचे प्रमाण घटलेले असू शकते असेही सांगण्यात आले आहे.