केज दि.१८ – केज शहरातून जाणाऱ्या दोन महामार्गाचे ( अहमदपूर-अहमदनगर आणि खामगाव – पंढरपूर) काम अत्यंत संथगतीने व दर्जाहीन होत असून हे काम करणाऱ्या एचपीएम व मेगा कंपन्यांनी तात्काळ कामाची गती वाढवून दर्जेदार काम करावे यात सुधारणा न झाल्यास येत्या सोमवार दि 21 जून 2021 रोजी वरील दोन्ही कंपण्याविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा केज विकास संघर्ष समितीचे समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे व महेश जाजू इत्यादी सदस्यांनी दिला आहे.
केज शहरातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर व अहमदपूर – अहमदनगर या दोन प्रमुख महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र केज शहर अंतर्गत भागात दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून दोन्ही कंपन्यांनी अत्यंत संथ गतीने काम सुरु ठेवले आहे. एखादा आठवडा काम सुरू ठेवायचे व नंतर दोन तीन महिने काम बंद ठेवायचे अशा प्रकारे काम सुरू आहे.
सध्या केज-कळंब रोडवर मेगा कंपनीचे कासम सुरू आहे. या कंपनीने मोंढ्या नजीक ओढ्यावरील पुलाचे काम सुरू केले आहे. काम सुरू होऊन कांही महिने झाले तरी काम आहे त्याच स्थितीत रेंगाळलेले आहे. कंपनीने मोठ्या भागात अद्याप नाली बांधकाम पूर्ण केलेले नाही. व ज्या भागात काम केले आहे ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. या कंपनीने पुलाच्या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता देखील अत्यंत वाईट अवस्थेत व धोकादायक स्थितीत आहे.कंपनीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीतुन आतील बाजूने तयार केलेला पर्यायी रस्ता चांगल्या अवस्थेत तयार करणे गरजेचे आहे.
एचपीएम कंपणीनेही काम खूपच संथ गतीने सुरू ठेवले आहे. या कंपनीने देखील पिसाटी नदीवरील पूल बांधकाम मंद गतीने सुरू ठेवले आहे. शहराच्या आतील भागात रस्त्याचे मोठे काम बाकी आहे. यामुळे याचा शहरातील नागरिक व व्यापारी यांना मोठा त्रास होत आहे. या कंपनीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व भवानी चौक यांची नव्याने आखणी करून बांधकाम करणे अपेक्षित आहे. यासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व शांतता समिती सदस्यांची बैठक केज तहसील कार्यालयाने बोलवावी जेणेकरून नव्याने होत असलेल्या बदलाची माहिती सर्वांपर्यंत पोहोंचू शकेल. या बाबी तात्काळ होणे गरजेचे आहे. या रस्त्यावरील इतर अनाधिकृत अडथळे काढून रस्ता बनवणे गरजेचे आहे.
दरम्यान दोन्ही कंपन्यांनी केज शहर अंतर्गत भागातील या महामार्गाचे काम लॉकडाऊन सुरू असताना पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही कंपनीच्या हलगर्जीपणामूळे हे काम रखडलेले आहे. आता या दोन्ही कंपन्यांनी केज शहर अंतर्गत भागातील सुरू असलेले काम तात्काळ अखंडितपणे सुरू ठेवून पूर्ण करावे नसता या दोन्ही कंपन्यांच्या विरोधात येत्या सोमवार दि 21 जून 2021 रोजी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीमध्ये दुपारी 1 वाजता बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.