Site icon सक्रिय न्यूज

आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला – पंकजा मुंडे……!

आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला – पंकजा मुंडे……!

बीड दि.१९ – ओबीसी आरक्षणासाठी भाजपने येत्या 26 जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्याच दिवशी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात ओबीसी आरक्षणासाठी चिंतन बैठकीचं आयोजन केलं आहे. तर, आरक्षण हक्क कृती समितीनेही 26 जून रोजी मोर्चाची हाक दिली आहे. त्यामुळे आरक्षण हक्क कृती समितीच्या मोर्चाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याविरोधात आरक्षण हक्क कृती समितीने राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे. येत्या 26 जून रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यातील 80 हून अधिक मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन आरक्षण कृती समिती स्थापन केली असून मोर्चाची हाक दिली आहे.                          शुक्रवारी मुंबईत भाजपची बैठक झाली. यात ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती दिली. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं सांगतानाच ओबीसींचं आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात येत्या 26 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर, राज्यातील एक हजार स्पॉटवर हे आंदोलन होणार आहे. सरकारकडून ओबीसींची दिशाभूल होत असून त्याचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे, असं सांगतानाच आरक्षण देणं हे सरकारच्या हातात असताना सरकारमधील लोक मोर्चे का काढत आहेत? असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

दरम्यान एकीकडे भाजपने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिलेली आहे. तर दुसरीकडे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या चिंतन बैठकीचं आयोजन केलं आहे. लोणावळ्यात येत्या 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

शेअर करा
Exit mobile version