Site icon सक्रिय न्यूज

‘या’ गावची शाळा ऑनलाइन नव्हे तर ऑफलाईन झाली सुरू……!

‘या’ गावची शाळा ऑनलाइन नव्हे तर ऑफलाईन झाली सुरू……!

अहमदनगर दि.१९ – कोरोनामुक्तीचा आदर्श घालून दिलेल्या हिवरेबाजार येथे ग्रामसभेने पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिलीचे वर्गही सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र, त्याबाबत निर्णय दिला नव्हता.

हिवरेबाजार येथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. कोरोना रुग्ण नसल्याने ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाला पत्र पाठवून परवानगी मागितली होती.मात्र, अधिकाऱ्यांनी जोखीम न पत्करण्याचे धोरण ठेवत मान्यता दिली नाही. त्यामुळे ग्रामसभा आयोजित करण्यात आली. त्यात योग्य ती काळजी घेऊन शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकही शाळा सुरू करण्याबाबत आग्रही होते. पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुले शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती उपसरपंच व राज्याच्या आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले.यावेळी ‘मुले आजारी असतील अथवा घरात कोणी आजारी असेल तर मुलांना शाळेत पाठवू नका,’ असे आवाहन करण्यात आलेले आहे. पाचवी ते सातवीच्या वर्गात १८२, तर आठवी ते दहावीच्या वर्गात ११२ विद्यार्थी असून उपस्थिती सुमारे शंभर टक्के आहे.

दहावीच्या परीक्षा यावर्षी झाल्या नाहीत. हिवरेबाजारच्या माध्यमिक विद्यालयाने मात्र दहावीच्या मुलांना अकरावीत अडचण येऊ नये, यासाठी त्यांची शाळेत चाळीस गुणांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा २५ जूनला होणार आहे. याबाबत उपसरपंच पोपटराव पवार म्हणाले, ‘मार्च २०२० पासून शाळा बंद असल्याने मुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाची परवानगी नसली तरी हिवरेबाजारने स्वत:च्या जोखमीवर शाळा सुरू केली आहे. कुठल्या मुलाला त्रास झाला तर आजारपणाचा त्रास गावाला उचलावा लागणार आहे.’

दरम्यान मुलांची प्रथम दररोज आरोग्य तपासणी होते. त्यानंतर शारीरिक अंतर ठेवून मुलांना बसविले जाते. सकाळी १० ते १ या वेळेत वर्ग भरतात. शाळेत जेवणाचे डबे आणू दिले जात नाहीत, तसेच मैदानावर खेळण्यास परवानगी नाही. केवळ वर्गात बसायचे व त्यानंतर गावात कोठेही न थांबता थेट घरी जायचे असे कडक नियम लावले आहेत.

शेअर करा
Exit mobile version