नवी दिल्ली दि.१९ – कोरोनाच्या काळात काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना तासंतास काम करायला भाग पाडत आहेत. अनेक कर्मचारी तर 12-15 तास काम करवून घेत असल्याच्या तक्रारी करत आहेत. त्यातच कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यातही कानकुच केली जातेय. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. अशातच आता सरकार कामगार कायद्यात नवी नियमावली तयार करत आहे. यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातील केवळ 4 दिवस काम करुन 3 दिवस सुट्टी देण्याची तरतुद करण्यात आलीय. सध्याच्या नियमांनुसार आठवड्यातील 6 किंवा 5 दिवस काम करावं लागतंय.केंद्र सरकार नवा कामगार कायदा तयार करत आहे. यात कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचे नियम आणि कामाच्या तासांबाबत नवी तरतुद करण्यात येणार आहे. नव्या नियमांवर कंपनी आणि कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर सहमतीने निर्णय होऊ शकतो.
नव्या नियमांनुसार 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीच्या परिस्थितीत दररोजचे कामाचे तास वाढवून कामाची वेळ अॅडजस्ट केली जाणार आहे. यात सरकार कामाचे तास 12 तासांपर्यंत वाढवणार आहे. विशेष म्हणजे यात एका आठवड्यात कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त 48 तास काम करवून घेता येणार आहे. जर सध्या आठवड्यात कर्मचारी 5 दिवस 9 तास काम करत असेल तर आठवड्यात 45 तास काम होतं. मात्र, 12 तासाच्या शिफ्टप्रमाणे 4 दिवसात 48 तास काम करावं लागेल.
विशेष म्हणजे 15 ते 30 मिनिटे अधिक काम केलं तरी ते अतिरिक्त काम (ओव्हरटाईम) म्हणून गृहित धरलं जाणार आहे. त्यामुळे अधिक काम करून घेणाऱ्या कंपन्यांना अधिक पैसे द्यावे लागतील. प्रस्तावित नियमांमध्ये कोणत्याही कर्मचारीकडून 5 तासांपेक्षा अधिक वेळ काम करुन घेण्यास बंदी असेल. सातत्याने 5 तास काम केल्यास संबंधित कर्मचाऱ्याला अर्धा तासाचा आराम करता येणार आहे.
दरम्यान केंद्र सरकार नवे कामगार कायदे तयार करुन 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीसह अनेक चांगले नियम करत आहे. मात्र, या नियमांची कठोर अंमलबजावणी होणार का असाही प्रश्न कामगार विचारत आहेत. याआधीही 8 तास कामासाठी 1 दिवस सुट्टी आणि अधिकच्या कामाला ओव्हरटाईम गृहीत धरुन मोबदला देण्याचा नियम होता. याशिवाय 9 तास काम केल्यानंतर आठवड्यात 2 दिवस सुट्टीचा नियम होता. मात्र त्याची कठोर अंमलबजावणी झालेली दिसली नाही. अनेक कंपन्यांनी कामगारांचं शोषण करत नियमांना केराची टोपली दाखवली. त्यामुळेच सरकार नवे नियम करण्यासोबत त्याच्या अंमलबजावणीची हिंमत दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे.