पुणे दि.१९ – पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजपकडून देखील या प्रकरणावरुन सडकून टीक करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी गर्दीवर नाराजी व्यक्त केली.
“मला प्रशांतने 10 तारखेला सांगितलं होतं की या कार्यक्रमाला भेट द्या, माझ्या स्वत:च्या मनामध्ये होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यालयाचं उद्घाटन करावं. पण सध्याचं एकंदरीत वातावरण, नियम, लोकांची उपस्थिती पाहता तसं केलं नाही. आम्ही लोकांची गर्दी होईल म्हणून सकाळी 7 वाजतादेखील उड्डाणपुलांचे उद्घाटन केलेली आहेत. अगदी तसंच सकाळी सातला उद्घाटन केलं असतं तर कार्यक्रमाला लोकं मर्यादित आली असती”, असा दावा अजित पवार यांनी केला.
“गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रसादला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पुण्याच्या कार्यक्रमावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “हे दुर्देवी असं चित्र आहे. अजित पवार यांच्यासारखे कठोर प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा याबाबत सूचना केल्या आहेत. आताच अजित पवार यांनी पुण्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांनी सांगताना कडक इशारा देतो, असं म्हटलं होतं. मला आता या निमित्ताने सरकारला प्रश्न विचारायचा आहे. आता या कार्यक्रमावर राज्य सरकार कुठली कारवाई करणार? हा प्रश्न आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“मुंबईत लोकलबाबत विचारलं तर तुम्हाला वाट पाहवी लागेल, शक्य नाही, असं सांगितलं जातं. सर्वसामान्य माणूस तुमचं सरकार म्हणून ऐकतो, संकट आहे म्हणून ऐकतो. तुम्ही सर्वसामान्यांना दम देणार, इशारे देणार, कायद्याचे बंधनांची दाख दाखवतात. पण तुमच्याकडून असं कृत्य होत असेल तर लोकांनी तुमचं का ऐकावं? आज पुण्यासारख्या शहरात लोक गुदमरले आहेत”, अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी टीका केली.
दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या मुद्द्यावरुन निशाणा साधला. “कोरोना व्हायरसची यांच्याशी चर्चा झाली असावी की जर तुम्ही गर्दी केली तरी मी तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुम्ही जर मुंबईत सर्वसामान्यांसाठी अधिवेशन भरवाल तर मी त्रास देईल. अनेक मंत्री मोर्चात सहभागी झाले. त्यावर काय कारवाई झाली? यावर हेच जमावबंदीचे आदेश लावतात. लग्नात 25 जणांपेक्षा जास्त जण असले तर वधू-वरावर गुन्हा दाखल करतात. अशी ही अंधेर नगरी चौपट राजा, गजब सरकरकी अजब कहानी, या सरकारचे हे अजब मंत्री. एकीकडे गर्दी जमवतात दुसरीकडे ज्ञान सांगतात”, असं मुनगंटीवार म्हणाले.