केज दि.२१ – जसजसे सोशेल मीडिया वापरकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे तसतसे धोके वाढले आहेत. सोशेल मीडिया मागच्या कांही दिवसांपासून असुरक्षित झाला असून हॅकर्स सहज कुणाचेही अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर करत आहेत. आणि याचाच प्रत्यय केज शहरातील दोन दिवसांत दोघांना आल्याने दुसऱ्याच्या नावाने पैशाची मागणीसह गुन्हे करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
परवा केज शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल गदळे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यांनाच श्रद्धांजली वाहण्यात आली त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा मानसिक ताण सहन करावा लागला. सदरील घटना ताजी असतानाच केज शहरातील अशोक खेत्रे नावाच्या तरुणाचे सह्याद्री प्रतिष्ठान नावाचे फेसबुक व इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून त्याच नावाचे बनावट अकाउंट तयार करून एकाला पैशाची तर एका मित्राला अपशब्द वापरल्याची घटना घडली आहे.
दरम्यान सदरील प्रकार वारंवार होऊ लागल्याने सोशेल मीडिया युजर्स मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामध्ये आतापर्यंत अनेकांना आर्थिक भुर्दंड झाला असून गैरसमज झाल्याने अनेकांची वादावादी सुद्धा झालेली आहे. सदरील प्रकाराने धास्तावलेल्या राहुल गदळे यांनी पोलिसांत तक्रार केली असून अशोक खेत्रे हे सुद्धा तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेले होते. मात्र त्यांना सायबर क्राईम ब्रँच कडे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे खेत्रे यांनी सांगितले.