Site icon सक्रिय न्यूज

तिसरी लाट लवकर येण्याची शक्यता गृहित धरुनच नागरिकांनी आपले सामाजिक वर्तन ठेवावे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे आवाहन…….!

तिसरी लाट लवकर येण्याची शक्यता गृहित धरुनच नागरिकांनी आपले सामाजिक वर्तन ठेवावे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे आवाहन…….!
बीड दि.२१ – सद्यस्थितीत जिल्हामध्ये कोवीड19 च्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल-3 चे निर्बंध लागु आहेत सदरील निर्बंधामध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणान्या आस्थापना दैनंदिन सुरु असल्याने जिल्हयातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसुन येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन दैनंदिन प्राप्त होणाऱ्या दैनिक अहवालावरुन असे निर्दशनास येते की, जिल्हयामध्ये मागील 10 दिवसांमध्ये 1602 रुग्ण संख्या आढळुन आलेली आहे.
               सदरील दहा दिवसातील रुग्ण व पॉझिटिव्हटी रेट पाहता, जिल्हयातील शहरी व ग्रामीण जनता निर्बंधाचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, जिल्हयातील सर्व जनतेने निर्बंधामधील शिथीलतेचा योग्य उपयोग करावा. नागरिक बंधने पाळणार नसतील तर त्याचा धोका स्वतः ला तसेच त्यांच्या कुंटुंबियांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरी लाट लवकर येण्याची शक्यता गृहित धरुनच नागरिकांनी आपले सामाजिक वर्तन ठेवावे तरच शिथीलतेचा योग्य उपयोग होईल.
                    आपला जिल्हा आगामी कालावधीत किती बंधनात राहील व शासन निर्देशानुसार कोणत्या स्तर (level राहील हे सर्वस्वी जनतेच्या वागण्यावर, नियम पाळण्यावर आणि कोवीड योग्य वर्तन’ ( Covid Appropriate Behaviour), दररोजच्या रुग्ण संख्या व पॉझिटिव्हटी दर वर अवलंबुन आहे.कोवीड विषाणूचा संसर्ग रोखणे ही सद्यस्थितीत एक सामाजिक जबाबदारी आहे याची प्रत्येक नागरिकांने जाणिव ठेवावी आणि स्वतःची व कुंटुंबाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तरच आणि तरच पुढची लाट थोपविणे शक्य होईल. हीच वेळ आहे पुढचे कठिण प्रसंग टाळण्याची. जनता भानावर राहीली तरच भविष्याचे संकट टाळु शकतो. परंतु विस्मरण होणे हा मानवी स्वभाव आहे. सबब दुसऱ्या लाटेत झालेली गंभीर परिस्थिती विसरुन चालणार नाही.आगामी कालावधीत निर्बंध कठोर होण्यापेक्षा शिस्तबध्द पध्दतीने व स्वयंशिस्तीने दिलेल्या शिथीलतेचा उपयोग केल्यास संभाव्य संकट सौम्य होवु शकते. ज्या लोकांनी आजपर्यंत कधीही आरटीपीसीआर अथवा अँटीजन टेस्ट केली नसल्यास त्यांनी स्वयंस्फुर्तीने अँटीजन तपासणी करुन घ्यावी हे त्यांच्या कुंटुबियांसाठी अत्यंत गरजेचे आहे.
                नागरिकांनी ग्रामीण तसेच शहरी भागातील समारंभास जाण्याच्या अगोदर समुहामध्ये वावरताना होणारा धोका याचा सारासार विचार करावा. राज्यातील विविध भागांमध्ये कोवीड विषाणूचा Delta Plus Varient हा नवीन प्रकारचा संक्रमित रुग्ण आढळुन येत आहे त्या दृष्टीने सर्व नागरिकांनी ‘कोवीड योग्य वर्तन’ ( Covid Appropriate Behaviour) चे काटेकोर पालन करावे.प्रत्येक नागरिकाने आपणास भेटणारा समोरील व्यक्ती कोवीड-19 संक्रमित असु शकतो असे गृहित धरुनच त्या सोबत वर्तन करावे. मग सदरील व्यक्ती हा प्रवासातील आपणासोबत असणारा सह प्रवासी असो, अथवा दुकानांमधील व्यवहार करणारे, हॉटेल मधील आजुबाजुचे ग्राहक, भाजी विक्रेते इ. कोणीही असो अशा वेळी आपण मास्क घातलेला असावा, सामाजिक अंतर राखलेले असावे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर केलेला असावा जेणेकरुन आपणास कोवीड-19 विषाणूचा कमीतकमी धोका होईल.
              तसेच नागरिकांनी शासकीय कार्यालयांमध्ये कमीत कमी गर्दी करावी, कार्यालयामधील सामुहिक वावर कमी करावा, अत्यंत आवश्यक कामकाज असेल तर कमीतकमी व्यक्तींसोबत कार्यालयामध्ये उपस्थित राहावे, हॉटेल / रेस्टॉरंट मध्ये अनावश्यक गर्दी करु नये.असे निर्दशनास येत आहे की, नागरिक सॅनिटायझरची उपलब्धता असुन देखील त्याचा सुयोग्य वापर करत नाहीत, घराबाहेर पडते वेळेस गर्दीच्या ठिकाणी मास्क चा वापर करत नाहीत, वेळोवेळी हात धुत नाहीत अशा अत्यंत आवश्यक प्राथमिक उपाययोजनांची नागरिकांनी स्वतः उपयोग करावा व कुंटुबियांना देखील या बाबींचे पालन करणेबाबत सवय लावावी.
                  आगामी तिसरी लाट ही बालकांकरिता धोकादायक असणारी आहे, सबब त्यांच्या आरोग्य विषयी कुटुंबातील सर्व सदस्यांनी जबाबदारी ओळखुन गांभिर्यांने ‘कोवीड योग्य वर्तन’ (Covid Appropriate Behaviour) चा विचार करावा.आपले आजुबाजुच्या परिसरात कोवीड-19 विषाणूंमुळे होणारे मृत्यू, विविध घटनांवरुन आपण जर बोध घेतला नाही तर सदरील बाब अत्यंत दुर्देवी असेल.
                  दरम्यान दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक ऍक्टीव रुग्ण संख्या 13207 इतकी होती, तिसऱ्या लाटेमध्ये ही संख्या तिप्पट होण्याची शक्यता आहे. यावरुन आगामी कालावधीत रुग्णांकरिता खाटांची उपलब्धतता मोठया प्रमाणावर लागणार आहे, त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कामकाज करत आहे. परंतु नागरिकांनी कावीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गांभिर्याने ‘कोवीड योग्य वर्तन’ ( Covid Appropriate Behaviour) चा तंतोतंत पालन करावे जेणेकरुन आपल्या सर्वांच्या सहकार्याने तिसरी लाट थोपविणे शक्य होईल. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
शेअर करा
Exit mobile version