मुंबई दि.२३ – कोरोनानंतर मुंबईसह राज्यभरातील जनतेला आता ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका आहे. ‘डेल्टा प्लस’ हा चिंताजनक विषाणू असून, त्याचे रुग्ण आढळलेल्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ रुग्णांचा समावेश असल्याचे केंद्राचे म्हणणे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात या नव्या विषाणूचे २१ रुग्ण आहेत.त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ‘डेल्टा प्लस’च्या फैलावाचा वेग अधिक असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे आढळले आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे. ‘डेल्टा प्लस’ हे कोरोनाचे (covid 19) ‘निरीक्षणाधीन उत्पर्विन’ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, ‘इन्साकॉग’ने ‘डेल्टा प्लस’ हे ‘चिंताजनक उत्परिवर्तन’ असल्याची माहिती दिल्याचे आरोग्य मंत्रालयानं नंतर जाहीर केलं.
दरम्यान भारतासह १० देशांत ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळले आहेत. त्यात अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. तर प्रथम भारतातच आढळलेल्या ‘डेल्टा’ विषाणूचे रुग्ण आतापर्यंत ८० देशांत आढळले आहेत.